Thursday 28 July 2016

श्री क्षेत्र मयुरेश्वर, मोरगाव

                                    श्री क्षेत्र मयुरेश्वर, मोरगाव
पुण्यापासून ६४ किलोमीटर, तर बारामतीपासून ३३ किलोमीटर अंतरावर कऱ्हा नदीच्या काठी अष्टविनायकापैकी प्रथम तीर्थक्षेत्र मोरगाव हे वसले आहे. ऐतिहासिक दगडी शिल्पकलेची प्राचीन मंदिरे, हे गावाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. राज्यभरातून येथे भाविकांची सतत वर्दळ असते. आदिलशाहीकाळातील सुपे परगण्याचे सुभेदार गोळे यांनी शहाजीराजांच्या राजवटीत येथील मयुरेश्वर मंदिराचे बांधकाम केल्याचा उल्लेख ग्रंथात आढळतो. गावाच्या सौंदर्यात भर घालणारे हे मंदिर गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मंदिर उत्तराभिमुख असून बांधकाम आदिलशाही पद्धतीचे आहे. मंदिरापासून जवळच कऱ्हा नदी वाहते. मंदिराजवळ भव्य पाच दीपमाला असून, समोरच उंदीर आणि नंदी यांचे भव्य मूर्ती आहेत. या ठिकाणी नगाराखानाही पाहण्यास मिळतो. येथील गणपतीची मूर्ती मखरात बसविलेली असून, गणेशमूर्तीच्या डोक्यावर नागफणा आहे. डोळ्यात हिरे बसविलेले आहेत. सभामंडपात आठ दिशांना गणपती असून एकदंत, महोदर, लंबोदर, गजानन, विकट, नटराज, धूम्रवर्ण आणि वक्रतुंड याशिवाय २३ परिवार मुर्तीही मंदिरात बसविलेल्या आहेत. वर्षभर येथे भाविकांची सतत वर्दळ असते.
                           मोरगाव क्षेत्राची वैशिष्ट्ये : 
येथील चतुर्द्वार, चार द्वारांवर श्री विष्णूलक्षमी, श्री शिवपार्वती, आदिशक्ती, रतीमदन तथा श्री सुर्यमहीबरासः देवता अशी रचना आहे. मंदिरापासून १० किलोमीटर अंतरावर चार दिशांना असणारे प्राचीन द्वारमंदिरे हे महत्वाचे वैशिष्टे आहेत. या प्रत्येक द्वारावर तीन टप्पे असून त्या ठिकाणी विविध देवता प्रस्थापित आहेत. यात्राकाळात धर्ममंडप, काममंडप, मोक्षमंडप या ठिकाणी अनवाणी चालत द्वारयात्रा करणेची प्रथा अनेक वर्षापासून विनाखंड सुरु आहे. मोरगाव तीर्थ क्षेत्राला २००५ मध्ये पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्याने या ठिकाणी लाखो रुपयांच्या निधीतून मंदिराचा जीर्नोद्वार व विविध विकासकामे झाली आहेत. भाद्रपद व माघ महिन्यात येथे मोठे उत्सव असतात. त्याप्रमाणेच विजयादशमी व सोमवती अमावास्या हे उत्सवही ग्रामस्थांकडून उत्साहात साजरे केले जातात.

बाहेरगावावरून येणारे भाविकांची भोजनाची व्यवस्था येथील काही पुरोहित वर्ग पाहतात. येथील तीर्थक्षेत्राची व्यवस्था चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून पहिली जाते.